TODAY'S PICKS

फक्त आजचा दिवस – ५ ते ८

फक्त आजचा दिवस – ५ – व्यसन आणि पैशांचे गणित नमस्कार बहुतेक जण स्वतःच्याच पैशाने व्यसनाला सुरुवात करतात. अनेकदा असं ऐकलंय की काही व्यसनाचे पदार्थ हे सुरुवातीला अगदी स्वतात पुरवले जातात. त्यांची माणसाला सवय लागावी म्हणून. एकदा माणुस त्या विळख्यात अडकला की मग त्या व्यसनाची भरमसाठ किंमत वसूल केली जाते. व्यसन करण्याची जागा ठरलेली असेल तर ती व्यसनी व्यक्तीला जास्तीत जास्त आरामदायक वाटावी यासाठीही प्रयत्न केले जातात. जूगाराच्या जागी पिण्याचीही सोय करुन देण्याचे उदाहरण मला माहित आहे. थोडक्यात काय तर व्यसनाला आर्थिक गणित असतं आणि ते व्यसन पुरवणार्‍यांना जास्तीत जास्त फायदेशीर व्हावं यासाठी व्यसनी माणसाची चांगली बडदास्त राखली जाते. अर्थात याला मर्यादा असतातच. व्यसनासाठी कर्ज देणारी माणसे तुम्ही ते कर्ज फेडू शकाल की नाही याचाही नीट अंदाज घेतच असतात. जोपर्यंत तुमची कर्ज फेडण्याची क्षमता आहे तो पर्यंत तुम्हाला कर्ज देणारी माणसे भेटतच जातात.  व्यसनामुळे कर्जबाजारी होऊन तुम्ही आणि तुमचे कुटुंब देशोधडीला लागले आहे याची पर्वा कुणालाच नसते. नोकरी, वाहन, राहते घर यावर हे कर्ज फेडणं अवलंबून असतं.  व्यसनीव्यक्तीसाठी व्यसन ही एकमेव प्राथमिकता असते आणि त्यासाठी पैशाची तजवीज करणे हा एकमेव विचार त्याच्या डोक्यात सकाळी उठल्यापासून सुरु असतो. अशावेळी तुम्हाला व्यसनापासून दूर करण्यापेक्षा तुम्हाला व्यसन पुरवून मजा पाहणारी काही विकृत माणसेही तुमच्या अवतिभवती मित्र म्हणून वावरत असतात. एकंदरीतच व्यसन तुम्हाला आर्थिक,

Read More »

फक्त आजचा दिवस – १ ते ४

फक्त आजचा दिवस – १ – तुम्हाला व्यसन सोडावेसे वाटते का? नमस्कार संशोधनाच्या दरम्यान ठाणे फॉलोअप ग्रुपला जात होतो. त्यावेळी नवीन आलेल्या रुग्णांना एकच एक प्रश्न वारंवार विचारला जात असे. तो प्रश्न म्हणजे “तुम्हाला दारु सोडायची आहे का?” ज्यांना व्यसनाबद्दल फारशी माहिती नाही त्यांना हा प्रश्न चमत्कारिक वाटण्याची शक्यता आहे. माणसाने व्यसनामुळे आपल्या आयुष्याचा खेळखंडोबा करून घेतला आहे. त्याच्या कुटूंबियांनी त्याला ग्रूपला आणले आहे. ती मंडळी मुक्तांगणला अ‍ॅडमिशनसाठी चौकशी करीत आहेत. असे असताना “तुम्हाला दारु सोडायची आहे का? ” हा काय प्रश्न झाला? त्या माणसाला दारु नक्कीच सोडायची असणार. त्यासाठीच तर तो येथे आला आहे. पण या गोष्टी इतक्या सहज आणि सोप्या नसतात. आणि खरं सांगायचं तर या प्रश्नाच्या प्रामाणिक उत्तरात तुमच्या सार्‍या व्यसनमुक्तीचे भविष्यही दडलेले असते असे आज इतक्या वर्षानंतर मी निश्चितपणे सांगु शकतो. मुक्तांगणला उपचारांसाठी येणारी सर्वच माणसे स्वत:च्या मनाने आलेली नसतात. त्यातील अनेकांना आपल्याला येथे मनाविरुद्ध आणले आहे असे वाटत असते. त्यातली काही माणसे घरच्यांवर राग धरुन असतात. तर काहींना आपण व्यसनी झालो आहोत हेच मान्य नसते. आपण व्यसनी झालो आहोत आणि आपल्याला उपचारांची गरज आहे हे मनापासून मान्य करणे ही व्यसनमुक्तीपथावरची पहिली पायरी आहे. आपलाअतुल ठाकुर१ सप्टेंबर २०२०फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे. फक्त आजचा दिवस – २ – मला व्यसन नाहीच नमस्कार पाठपुराव्याला काही

Read More »

फक्त आजचा दिवस – ९० – दोन टोकाच्या भावना

व्यसनात असताना अतिशय हतबलतेची भावना मनात असते. काहींना आपण व्यसनात खोल रुतत चाललो आहोत हे जाणवतं. पण व्यसनाने शरीर मनावर इतका जबरदस्त कबजा केलेला असतो की त्यावर त्याला स्वतःहून काही करता येत नाही. ही आत्यंतिक हतबलतेची भावना हे व्यसनी माणसाच्या विचारांचे एक टोक असते. तर दुसर्‍या बाजूने व्यसनमुक्तीच्या वाटेवर जेव्हा माणुस चालु लागतो तेव्हा काहीजण दुसरे टोक गाठतात. व्यसनमुक्तीमुळे आयुष्याची गाडी हळूहळु रुळावर येऊ लागलेली असते. मनात वाटतं बस! हे असंच हवं होतं. शेवटी सर्व काही मार्गावर आलं. आपण काहीतरी मिळवलं ही भावना गैर नाही. कारण व्यसनमुक्तीच्या मार्गावर चालून आपण खरोखरंच काहीतरी मिळवलेलं असतं. पण आपल्याला व्यसनमुक्तीत यश मिळु लागलं याचा अर्थ आपली रिकव्हरीची प्रक्रिया संपली असा होत नाही हे आवर्जून लक्षात घेणे आवश्यक आहे. या टप्प्यावर ज्यांना अतिआत्मविश्वास असतो ती मंडळी व्यसनाच्या फसवेपणाकडे दुर्लक्ष करतात. व्यसनाचा घातकीपणा आता त्यांना पूर्वीसारखा भयंकर वाटत नाही. व्यसनातील धोका आता त्यांना तितकासा काळजीकरण्याजोगा वाटत नाही. कारण या मंडळींना स्वतःच्या संयमाबद्दल गैरवाजवी विश्वास वाटतो. आपला स्वतःवर ताबा आहे याची त्यांना खात्री असते. येथे त्यांच्या स्वभावातील अतिआत्मविश्वास त्यांच्या वर्तनात  डोकावू लागतो असे मला वाटते. आपलाअतुल   ठाकुर२९ नोव्हेंबर   २०२०फक्त आजचा दिवस   आपल्याला व्यसनमुक्त राहायचे आहे…

Read More »

फक्त आजचा दिवस  – ८९ – सोबराईटीतील प्रांजळपणा

प्रांजळपणा,  प्रामाणिकपणा, नम्रपणा किंवा पाय जमिनिवर राखण्याची सवय या सार्‍या गोष्टी सोबराईटी  टिकवण्यासाठी आवश्यक आहेत अशी माझी समजूत आहे कारण त्या अतिआत्मविश्वासाला प्रतिबंध  करतात. अनेकदा माणसे दुसरं टोक गाठतात. अतिआत्मविश्वास वाईट मग आम्ही  काय सतत पुढे काय घडेल, सोबराईटी टिकेल की नाही याच चिंतेत राहायचं की  काय? मूळात आपले पाय जमिनीवर असले तर सतत चिंतेत राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण  जेव्हा आपण यशाच्या शिखरावर आहोत असं वाटतं तेव्हा पुर्वीचे दिवस आठवून बेसावध  राहु नये इतकाच मुद्दा आहे. मला अनेकदा  वाटतं अतिआत्मविश्वासाला डिवचणार्‍या इतरही गोष्टी असु शकतात. कदाचित जुने व्यसनी  मित्र तुम्हाला हरभर्‍याच्या झाडावर चढवून तुमची मजा पाहण्याचा प्रयत्न करु शकतात.  तुमच्या नेहेमीच्या दारु पिण्याच्या जागा तुम्हाला खुणावू शकतात. होळी,  गटारी सारखे सण तुम्हाला व्यसनाकडे जायला मोहात पाडण्याची शक्यता नाकारता येत नाही.  मित्रांच्या, ऑफीसमधल्या पार्ट्यांमधले वातावरण तुम्हाला भूल पाडू शकते. याचं  कारण तुम्ही जरी व्यसनमुक्तीच्या वाटेवर चालु लागला असलात तरी जग तेथेच असते आणि  तुमच्या आजुबाजुची माणसेही तशीच असतात. अशावेळी पाय  जमिनीवर असले की काम सोपे होऊ शकते आणि अतिआत्मविश्वास असेल तर काम बिघडू शकते हे  लक्षात घेणे आवश्यक आहे. आपलाअतुल   ठाकुर२८ नोव्हेंबर   २०२०फक्त आजचा दिवस   आपल्याला व्यसनमुक्त राहायचे आहे…

Read More »

फक्त आजचा दिवस – ८८ – सोबर असताना

व्यसनाच्या तळाशी जाऊन जेव्हा माणुस उपचारकेंद्रात दाखल होतो आणि उपचार घेऊन सोबर होऊ लागतो तेव्हा यश मिळाल्याची भावना निर्माण होते. त्यात गैर काहीच नाही. अनेक वर्षे व्यसनात वाया घालवलेली असतात. अमाप पैसा वाया गेलेला असतो. कुटुंब दूर झालेले असते. कदाचित नोकरीही गमवलेली असते. जेव्हा माणूस व्यसनमुक्तीच्या मार्गाने वाटचाल करु लागतो तेव्हा ही परिस्थिती हळूहळु का होईना पालटायला लागते. नोकरी लागते. पैसा येऊ लागतो. नातेवाईक मित्र जवळ येऊ लागतात. कुटूंबात प्रेम निर्माण होतं. अशावेळी आपण काहीतरी भरीव मिळाल्याची भावना निर्माण होत असते. फार मोठं यश आपण मिळवलं. कुठलंतरी मोठं पारितोषिक मिळवलं असं माणसाला वाटतं. आणि ते खरंच असतं. व्यसनाच्या तळाशी जाऊन पुन्हा वर येणे आणि गमावलेल्या गोष्टी परत मिळवणे हे सोपे काम नाही. त्यासाठी माणसाचं कौतूक झालंच पाहिजे. पण हे एवढ्यावरच थांबलं असतं तर ठीक होतं. पुढे माणसाच्या मनात वेगळेच विचार येऊ लागतात आणि सर्व हवा बिघडून जाते. “आपल्याला सोबर राहणं हे जमलेलं आहे. आपल्याला सोबराईटीचं तंत्र उमगलेलं आहे. आता आपल्याला कुठलीही गोष्ट व्यसनाच्या तळाशी नेऊ शकणार नाही. आता आपण स्वतःवर ताबा ठेवू शकतो.” एकदा हे विचार मनात येऊ लागले की पुढची पायरी ठरलेली असते. “आपण स्वतःवर ताबा ठेवू शकतो मग एखाद पेगचा बाऊ कशाला करायचा? कुणाला कळणारही नाही. आपण स्वतःला कधीही कंट्रोल करु शकतो.” अशासारखे विचार मनात येणे म्हणजे व्यसनाच्या

Read More »

फक्त आजचा दिवस   – ८७ – उपचारकेंद्रात आल्यावर

ज्यांना आपण घरच्यांनी जबरदस्ती केली म्हणून आपल्याला येथे यावं लागलं असं वाटतं अशी माणसं उपचारकेंद्रात आल्यावर उपचारांमध्ये मनापासून सहभागी होत नाहीत हे आपण पाहिलं पण असंही असु शकतं  की जी माणसं स्वतःच्या मनाने आली आहेत त्यांच्याही मनात काही दिवसांनी “आपल्याला खरोखर येथे येण्याची, राहण्याची, उपचार घेण्याची गरज आहे का?” असे विचार येऊ शकतात. याला कारण आहे. अनेकदा माणसाने व्यसनात रॉकबॉटम गाठलेला असतो. घरचे वैतागलेले असतात. त्रासलेले असतात. काय करु नि काय नको असं सर्वांना होऊन गेलेलं असतं. कौटूंबिक स्वास्थ्य तर हरवलेलंच असतं पण आर्थिक परिस्थितीही खालावलेली असते. अशावेळी सर्वांनाच व्यसनी व्यक्तीने उपचारकेंद्रात दाखल होऊन उपचार घ्यावेत असं वाटतं. त्याप्रमाणे माणसे व्यसनी व्यक्तीला उपचारकेंद्रात दाखल करतातही. पण उपचारकेंद्रात दाखल झाल्यावर काही दिवसांनी परिस्थितीचा ताण कमी होतो. मग एकदा ही निकडीची अवस्था संपली कि मनात हे विचार डोकावू लागतात की आपल्याला खरं तर उपचारकेंद्राची गरजच नव्हती. एकदा असे विचार मनात यायला लागले की पुढे उपचारांमध्ये भाग घेणे कठीण होऊ लागते. अतिआत्मविश्वासाची ही आणखी एक छ्टा आहे. आपलाअतुल  ठाकुर२६ नोव्हेंबर   २०२०फक्त आजचा दिवस  आपल्याला व्यसनमुक्त राहायचे आहे…

Read More »

फक्त आजचा दिवस  – ८६ – अतिआत्मविश्वासाच्या सूक्ष्म छटा

अतिआत्मविश्वासाबद्दल बोलताना त्यातले बारकावे लक्षात घ्यावे लागतील. एखादे भयंकर श्वापद सावजाच्या मागावर असावे, त्याने पावलाचा जराही आवाज होऊ न देता मागून येऊन सावजाला धरून त्याचा घात करावा तसा अतिआत्मविश्वास व्यसनमुक्तीच्या वाटेवर चालणार्‍यांचा घात करतो. त्यामुळे यापुढील चर्चेत काहींना पुनरुक्ती म्हणजेच तोच तोच मुद्दा आहे असे वाटण्याची शक्यता आहे. पण तसे नाही. बारकाईने लक्ष दिलं तर असं आढळून येईल की आपण अतिआत्मविश्वासाच्या एक वेगळ्या छटेबद्दल बोलत आहोत. अर्थातच अतिआत्मविश्वासाचा अभ्यास करताना एक पक्कं लक्षात ठेवावं लागतं की त्याच्या छटा कितीही असल्या तरी अंतिम परिणाम एकच असतो तो म्हणजे स्लिप किंवा रिलॅप्स. जेव्हा आपण व्यसनी माणसाचा अभ्यास करतो तेव्हाही असे जाणवते की ते व्यसन सुरु राहण्यास व्यसनातला अतिआत्मविश्वास कारणीभूत झालेला असतो. अनेक शेयरींग्जमध्ये माणसे असं सांगतात की मला व्यसनाच्या दरम्यान सर्व काही कळतं असं वाटायचं. व्यसनमुक्तीकेंद्रात दाखल केल्यावर आपल्याला याची गरज नाही, आपल्याला हे सारं माहित आहे असं वाटणारीही माणसे होती. आणि उपचार घेऊन बाहेर पडल्यावर आता आपल्याला सर्व माहित झाले आहे असं वाटणारी माणसे आहेत. त्यामुळे अतिआत्मविश्वास हा व्यसनात काय आणि व्यसनमुक्तीत काय नेहेमी कळत नकळत डोकावू शकतो आणि त्यावर बारीक लक्ष ठेवावे लागते हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. आपलाअतुल ठाकुर२५ नोव्हेंबर २०२०फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचे आहे…

Read More »

आनंदघन

मैत्र

व्यसनमुक्ती